भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने 352 जागा जिंकल्या आहेत. एनडीएचा हा विजय 2014 पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान भाजपने आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तर मोदी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान जनतेने काँग्रेससह महाआघाडीला मोठा दणका दिला आहे. काँग्रेस पुरस्कृत संयुक्त पुरोगामी आघाडीला (युपीए) केवळ 86 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर अन्य पक्षांनी 104 जागा जिंकल्या आहेत.
अभूतपूर्व विजयामुळे मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतचा मार्ग सुकर नव्हे तर निश्चित झाला आहे. वाराणसीतून मोदी यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विजय संपादन केला आहे. मोदींनी तब्बल 3 लाख 84 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. 2014 मध्ये मोदी 3 लाख 82 हजार मतांच्या फरकांने विजयी झाले होते.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा जिंकता आली आहे.