पुणे : शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो आणि व्हिडीओ काढून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऋषिराज पवार याला मारहाण करत विवस्त्र करुन तिथं एका महिलेला आणून व्हिडीओ तयार करुन यासाठी 10 कोटी मिळणार असल्याचं भाऊ कोळपेनं सांगितल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. अपहरण करण्यात आलेला ऋषिराज पवार सध्या शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला आहे. सरोदे यांच्या पत्रकार परिषदेला अशोक पवार यांची मुलगी देखील उपस्थित होती.
ऋषिराज पवार काय म्हणाला?
भाऊ कोळपे हा दिवसभर आमच्या प्रचारात फिरला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला माझ्या गाडीत बसवलं. आमची गाडी मांडवगण वडगाव पर्यंत नेली असता तिथून पुढं चारचाकी गाडी जाणार नाही असं सांगितलं. तिथं कोळपेच्या मित्रांच्या दोन दुचाकी आलेल्या होत्या, असं ऋषिराज पवार म्हणाला. कच्च्या रस्त्यातून बंगल्यापर्यंत बाईक नेण्यात आल्या. बंगल्यात नेण्यात आलं, तिथं रुममध्ये बोलावण्यात आलं. भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला. एक बेड होता, तिथं बसवलं, हात पाय पकडले दोघांनी, त्यांच्यापैकी एकानं शर्टची बटणं उघडायला सुरुवात केली. मी त्याला विरोध म्हणून धक्काबुक्की करायला लागलो, पैशासाठी करत असाल तर करु असं सांगितलं . पण, तिथं पडलेलं कापड घेतलं, माझ्या तोंडावर दाबलं, गळा दाबला, मारुन टाकण्याची भीती घातली, असं ऋषिराज पवार यानं म्हटलं. यानंतर कापड काढून त्यांनी पिशवीतून एक दोरी काढून दाखवली. त्यांनी आम्हाला व्हिडीओ हवाय असं सांगितलं. त्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या जीवाला घाबरुन अडचण आणणार नाही हे सांगितलं. त्यांनी माझे कपडे काढले, चौथा माणूस होता त्यांनी एक बाई आणली होती. दरवाजा उघडल्यावर बाई आत घेतली. इतर दोघे बाहेर गेले. भाऊ कोळपे यानं मोबाईलचा कॅमेरा बाहेर काढला, महिलेला बेडवर झोपण्यास त्यानं सांगितलं. तो व्हिडीओ घेत होता. भाऊ कोळपेनं फोटो व्हिडीओ काढले, व्हिडीओत तो सूचना देतोय, हे रेकॉर्ड झालंय. त्यानंतर महिलेला बाहेर काढलं, इतर दोघे आत आले. असं ऋषिराज पवार म्हणाला.
पुण्यातून या व्हिडीओसाठी समोरच्या पार्टीकडून 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचं भाऊ कोळपे आणि इतरांनी सांगितल्याचं ऋषिराज पवारनं म्हटलं. बाईक वरुन जात असताना मित्रांना मेसेज करुन ठेवले होते, हा आला की त्याला पकडा असं सांगितलं होतं. जसा भाऊ कोळपे आला तसा त्याला धरण्यात आलं. आम्ही पकडून त्याला मित्राच्या घरात कोंडून ठेवलं असं ऋषिराज पवार यानं म्हटलं.
असीम सरोदे काय म्हणाले?
शिरूर हवेली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार हे उमेदवार असून आरोप प्रत्यारोप होत असतात.अशोक पवार आमदार असून त्यांच्या मुलावर जो प्रसंग झाला असून तो अत्यंत वाईट असल्याचं असीम सरोदे म्हणाले. शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणे गरजेचं आहे. हे कोणी केलं याबाबत तपास सुरू आहे.आमदार अशोक पवार हे देखील टेन्शन मध्ये आहेत, असं असीम सरोदे म्हणाले. अशोक पवार हे देखील पोलीस स्टेशनला गेल्याची माहिती आहे.
अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली पवार हिनं आज घडलेल्या प्रकारानं कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं.
इतर बातम्या :