Pune: नातवाच्या खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात बंडू आंदेकरची भावजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी पुण्याच्या विशेष 'मोक्का' न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.
आयुष कोमकरचा खून, निवडणूकीचा अर्ज
वनराज आंदेकरच्या खुनानंतर दोन्ही टोळ्यांमधील संघर्ष वाढला आणि त्याच वैरातून 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकरचा खून करण्यात आला. या प्रकरणी टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकरसह कुटुंबातील नऊ सदस्यांसह एकूण पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या आरोपींपैकी बारा जण पोलिस कोठडीत आहेत, तर लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर हे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहेत.
कोठडीत असूनही निवडणूक लढविण्याची परवानगी मिळावी, यासाठी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दोघींना महापालिका निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नमूद केले. त्यानुसार दोघींना नामांकन प्रक्रिया आणि निवडणुकीशी संबंधित कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयानंतर आंदेकर कुटुंबातील दोन महिला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रकरणातील आरोपींच्या उपस्थितीतही निवडणूक प्रक्रियेला न्यायालयाने मार्ग खुला करून दिला आहे.
निवडणूक लढवण्याचा कायदेशीर अधिकार
कोठडीत असतानाही निवडणूक लढविण्याचा त्यांना असलेला कायदेशीर अधिकार नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी मांडला. त्यांच्या उमेदवारीमुळे तपासात अडथळा निर्माण होणार नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत सुरू राहील, हेही कोर्टासमोर स्पष्ट करण्यात आले. या सर्व मुद्द्यांचा विचार करून विशेष मोक्का न्यायालयाने दोघींनाही निवडणुकीत उतरण्यास हिरवा कंदील दिला. आदेशानुसार, निवडणुकीच्या मुदतवाढीपर्यंत प्रक्रियात्मक कामे करण्यास त्यांना परवानगी देण्यात आली असून, आवश्यक ती कागदपत्रे आणि नामांकन भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयानंतर आंदेकर कुटुंबातील दोन्ही महिला पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः वनराज आंदेकरच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या वातावरणामुळे, सोनाली आंदेकरच्या प्रवेशामुळे मतदारांच्या निर्णयावर त्याचा काय परिणाम होईलकी नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आयुष कोमकर हत्येचा तपास आणि आंदेकर-गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाचा मागोवा घेणे पोलिसांसमोर अद्याप मोठे आव्हान आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक रणधुमाळीत आंदेकर कुटुंबाची उपस्थिती निश्चित झाली आहे.