कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत लाडक्या बहिणींना धमकावून अडचणीत आलेल्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून महाडिक यांना आक्षेपार्ह विधानासाठी नोटीस धाडण्यात आली आहे. खासदार महाडिक यांनी महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी (ता.करवीर, जि. कोल्हापूर) येथील जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्याने आयोगाकडून त्यांना नोटिस धाडण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे. 


पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो!


दरम्यान, लाडक्या बहिणींना धमकावल्याने वाद वाढल्यानंतर धनंजय महाडिक यांनी माफी मागितली होती. सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे वक्तव्य कुठल्याही माता-भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते, तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त माहिती सरकारमुळे यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः व्होट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रति आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्ष भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमी चांगले काम करत आलो आहे आणि यापुढे देखील करत राहील महिलांचा सन्मान आणि सशक्तिकरणबाबत माझ्या या प्रयत्नाची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या माता भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. 


काय म्हणाले धनंजय महाडिक?


महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर इथं काँग्रेसची निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे 1500 रुपये घेतात त्या महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. महाडिक पुढे म्हणाले की, अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकीच महाडिक यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या