प्रियांका गांधी म्हणाल्या की, "निवडणूक प्रचारात भाजप नेते कधी हे बोलत नाहीत की त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली की नाहीत. कधी शहीदांच्या नावावर मतं मागतात, तर कधी माझ्या कुटुंबातील शहीदांचा अपमान करतात. त्यांनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला आहे. ही निवडणूक एका विशिष्ट कुटुंबाची नाही. ही त्या सर्व कुटुंबांची आहे, ज्यांची आशा-अपेक्षा या पंतप्रधानांनी पूर्णत: तोडल्या.
मोदींची दुर्योधनाशी तुलना
प्रियांका गांधी म्हणाल्या की, "देशाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण देशाने अहंकाराला कधीही माफ केलेलं नाही. इतिहास याचा साक्षीदार आहे. महाभारतामध्येही जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेला होता तेव्हा त्यालाही कैद करण्याचा प्रयत्न झाला होता." यानंतर प्रियांका गांधींनी यावर रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता ऐकवली. ती अशी, "जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है, हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरुप-विस्तार किया, डगमग-डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले-जंजीर बढ़ा कर साध मुझे, हां, हां दुर्योधन! बांध मुझे।"
भाजपचं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुर्योधनाशी तुलना केल्याने भाजपनेही पलटवार केला आहे. पश्चिम बंगालच्या रॅलीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, "प्रियांकांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे. दुर्योधन कोण आहे आणि अर्जुन कोण आहे हे 23 मे (निकाल) रोजी सिद्ध होईल."
राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन : मोदी
पंतप्रधान मोदींनी एका सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटलं होतं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. तर राहुल गांधी यांनी मोदीजी, लढाई संपली आहे, कर्म तुमची वाट पाहत आहे अशी संयमी प्रतिक्रिया दिली होती. तर आजच्या सभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, "आमच्या देशाच्या जनतेमध्ये विवेक आहे, हा विवेक नवा नाही, अनेक वर्ष जुना आहे. तुम्ही देशाच्या जनतेची दिशाभूल करु शकत नाही. काँग्रेस ही निवडणूक मुद्द्यांवर लढत आहे."