भाजपची चौथी उमेदवार यादी आज जाहीर झाली. यात अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. त्यात प्रकाश मेहता यांचाही समावेश आहे. भाजपने घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी दिली. यानंतर पराग शाह सदिच्छा भेटीसाठी प्रकाश मेहता यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु इथे त्यांना मेहता समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखून तोडफोड केली. फॉर्म भरण्यासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती.
विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, भाजपची चौथी यादी जाहीर
अखेर प्रकाश मेहता, किरीट सोमय्या यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. "भांडण करणं, गाड्या फोडणं ही आपली संस्कृती नाही," असं प्रकाश मेहतांनी सांगितलं. परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. "तुम्ही अपक्ष निवडणूक लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू," अशा घोषणा कार्यकर्ते करत होते.
दरम्यान, घाटकोपर पूर्व हा भाजपचा गड समजला जातो. प्रकाश मेहता भाजपचे मुंबईतील एकमेव उमेदवार आहे, ज्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मागील 25 वर्षांपासून ते घाटकोरचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. परंतु यंदा त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. समर्थक मेहतांना अपक्ष निवडणूक लढवण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे आता प्रकाश मेहता काय निर्णय घेणार हे पाहंण औत्सुक्याचं असेल.