मुंबई : मोदी हा मोठा ब्लॅकमेलर आहे, त्यांनी आधी काँग्रेसला ब्लॅकमेल केलं आता सेनेला ब्लॅकमेक केलं. इतकं ब्लॅकमेल केलं की एका दिवसात त्यांनी विचार बदलला, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी भाषेत टीका केली आहे. कुर्ल्यात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मोदी हे एक नंबरचं खोटारडं पात्र आहे. जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा उतावळा नवरा असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही 300 दहशतवादी मारले. एक तरी मेलेला दहशतवादी दाखवला का?, असा सवाल त्यांनी केला. मोदींनी आपलं स्थान मातीत मिळवलं आहे. जगात लोक बोलतं आहेत तुमचा खोटारडा पंतप्रधान कधी जाणार आहेत. आपले परदेशात राहणारे भारतीय म्हणत आहेत आमची पीएममुळे मान खाली गेली आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

आता मोदी म्हणत आहेत मला 5 वर्ष पुन्हा निवडून आणा, मी घोटाळेबाजांना आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, मला सांगा मोदी तुम्ही रॉबर्ट वाड्राला का आतमध्ये टाकत नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप हे सगळे नात्यातले उमेदवार उभे करून निवडणूक लढवत आहेत. आपल्याला दाखवायला ही निवडणूक आहे. सत्ता कोणाचीही येवो, उमेदवार आपल्याच कुटुंबाचा येणार हे त्यांना माहित आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या शाखेशाखेत करकरे, कामटे यांचे फोटो लावले जातात.प्रज्ञा ठाकूरने हेमंत करकरे यांच्या विरोधात वक्तव्य केलं. त्यावेळी शिवसेनेवाले आणि उद्धव ठाकरेंनी याचा निषेध का केला नाही. मराठी माणसाच्या नावाने राजकारण करता  मग तुम्ही या साध्वी प्रज्ञाचा निषेध का केला नाही? तुम्ही युती का तोडली नाही? असा सवाल त्यांनी केला.  कोणत्या तोंडाने तुम्ही भाजपला मतं देणार? त्यांचं बलिदान असंच जाणार का? शिवसेनेला एक स्वतः चा मतदार आहे. मग तुम्हाला या कुबड्याची गरज का पडते, असंही आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री देखील याविरोधात काही बोलत नाहीत. तुम्ही 5 वर्ष आहात, ही पदाची नशा तुम्ही चढू देऊ नका, असेही ते म्हणाले.