नवसारी, गुजरात : विरोधक महाआघाडी करुनही कुत्र्या-मांजरासारखी भांडतात, असा घणाघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. काँग्रेसची सध्याची परिस्थिती 'धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का' या म्हणीप्रमाणे झाल्याचंही पूनम महाजन म्हणाल्या. सपा आणि बसपा म्हणजे कधी हत्तीला सायकल चालवताना पाहिलं आहे का, असा सवालही पूनम महाजनांनी उपस्थित केला आहे. पूनम महाजन गुजरातमधील नवसारीच्या दौऱ्यावर होत्या.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विविध पक्षांतील नेत्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. राजकीय विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी नेतेमंडळी सोडताना दिसत नाहीत. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्षा पूनम महाजन गुजरातमध्ये प्रचार सभा घेत आहेत. उत्तर गुजरातमध्ये मराठी भाषिक उमेदवार आणि मतदार असल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी पूनम महाजनांनी चांगलीच कंबर कसली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचं संमेलन भरताना कधी पाहिलं आहे का? तिथे भाड्यावर आणलेले लोक कधी काँग्रेसच्या तर कधी सपा-बसपाच्या मेळाव्यांना जाताना दिसतात, असा घणाघातही पूनम महाजनांनी केला.
मोदींचे निकटवर्तीय खासदार सी आर पाटील पुन्हा एकदा मैदानात आहेत. मराठी माणूस असल्याने मी आज गुजरात राज्यात प्रचारासाठी आली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवण्याचं प्रमोद महाजन यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणं सुदैव आहे, अशी प्रतिक्रिया पूनम महाजनांनी दिली.
गुजराती जनतेसमोर पूनम महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या आठवणींना उजाळा दिला. गुजराती जनता आणि प्रमोद महाजन यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. ते अनेक वेळा सिद्धही झालं आहे. आता त्यांची कन्या आपल्या मराठी शिलेदारांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.
महाआघाडी करुनही नेते कुत्रे-माजरांसारखे भांडतात, पूनम महाजनांचा घणाघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Mar 2019 08:13 AM (IST)
काँग्रेसची सध्याची परिस्थिती 'धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का' या म्हणीप्रमाणे झाली आहे. कधी हत्तीला सायकल चालवताना पाहिलं आहे का, भाजप खासदार पूनम महाजनांची महाआघाडीवर टीका
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -