Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.


यूपीच्या कोणत्या जागांवर मतदान


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान होणार आहे.


उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान


उत्तराखंडमधील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतजानाला सुरूवत होणार आहे. संध्याकाळी  6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकऱ्यांनी दिली.


गोव्यात 40 जागांसाठी मतदान


गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोवा विधानसभेत सध्या चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी गोव्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिथे आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC)हे निवडुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजप यांच्यातही चांगली लढत होणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनीही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जरी आज पार पडली तरी कोण निवडणूक जिंकले हे पाहण्यासाठी 10 मार्चची वाट पाहावी लागणार आहे.