मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत. येत्या 9 एप्रिलला औसा येथे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी एकत्र येणार आहेत.


शिवसेना-भाजप सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर अनेकदा टीकास्त्र सोडलं होतं. राम मंदिर, नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, राफेल, शेतकरी कर्जमाफी इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपला कोडींत पकडण्याचे प्रयत्न केले.


अनेकदा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली होती. काही वेळा भाजपकडूनही मोदींवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न झाले.


एकूणच सत्तेत एकत्र असले तरी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र युतीच्या घोषणेनंतर आता हा दुरावा मिटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र योग जुळून येत नव्हता. अखेर आता दोन्ही नेते औसा येथील सभेत एकत्र दिसणार आहे. त्यामुळे तमाम शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा 9 एप्रिलच्या या सभेकडे लागल्या आहेत.




VIDEO | युती आणि आघाडी कोणाच्या पथ्यावर? | कौल मराठी मनाचा | मूड देशाचा