मुंबई :  इमानदारांच्या पैशांवर टाच येऊ देणार नाही तर बेईमानांवर कारवाई होण्यापासून कुठलीच ताकद थांबवू शकत नाही, आता जर कोणी चूक केली तर त्याला शिक्षा मिळणारच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत पुन्हा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'माझे लहान बंधू' असा केला.


यावेळी मोदी म्हणाले की, मागच्या पाच वर्षांत केंद्र किंवा राज्यात भ्रष्टाचाराचा एकही डाग आमच्यावर लागला नाही. भाजपच्या मुळात जनभागीदारी आहे. गरिबांना सशक्त बनवण्यासाठी अनेक प्रयत्न आम्ही केले आहेत, असे मोदी म्हणाले.  घाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? आघाडीने तर आदर्श घोटाळा करुन लष्करातल्या जवानांच्या घराबाबतही घोटाळा केला असाही आरोप  नरेंद्र मोदींंनी केला.

मोदी पुढे म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात मेट्रोच्या कामाची गती कासवालाही लाज वाटेल अशी होती. मुंबईत घर घेण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना रियल इस्टेट माफियांपासून कुठलंच संरक्षण नव्हतं. रेरा कायदा आणून घरमालकांचा आवाज बुलंद केला.  लाखोंना परवडणारी घरं दिली तर लाखोंना घरं देणार आहोत. घरकर्जाच्या व्याजदरात सवलत दिली, ज्यामुळे चार ते पाच लाखांचा दिलासा मिळतो, असेही मोदी म्हणाले.

लोकांच्या पैशांवर डल्ला मारणारे काही तिहार जेलमध्ये आहेत तर काही इथल्या जेलमध्ये आहेत. आता तर साफसफाईची सुरुवात झालीय, अजून खूप वेगाने काम होणार आहे.  इमानदारांच्या पैशांवर कोणतीही टाच येऊ देणार नाही तर बेईमानांवर कारवाई होण्यापासून कुठलीच ताकद थांबवू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

मुंबईशी आमचं गर्वाचं नातं आहे. कारण आमच्या पक्षाचा जन्म या मुंबईच्या धर्तीवर झाला. मुंबईच्या धर्तीची मोठी महानता आहे. मुंबईत ह्युमन कॅपिटल, व्हेंचर कॅपिटल आहे.  जगभरातील गुंतवणूकदारांना मुंबईत यायचं आहे, असेही ते म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी मुंबईतल्या विकासापेक्षा मंत्रालयातील 'इंफ्रास्ट्रक्चर'वर जास्त विचार व्हायचा. मंत्रालयात कुणाला मुख्यमंत्री करायचं, कुणाला खाली खेचायचं अशी कामं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात व्हायची.  मात्र आम्ही लोकांसाठी कामं  केली. त्याचमुळं पन्नास वर्षांनंतर महाराष्ट्राला सलग पाच वर्षे मुख्यमंत्री लाभला. हे तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही स्थैर्य निवडलं, असे मोदी म्हणाले.