मुंबई : मतदानाला सुट्टी देऊन फिरायला येणार असाल तर आमच्याकडे बुकिंग मिळणार नाही, असा स्पष्ट निर्णय जुन्नरमधील एका पर्यटन केंद्राने घेतला आहे. जुन्नरमधील या पर्यटन केंद्राच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

जुन्नर मधील पराशर कृषी पर्यटन केंद्रानं मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशीचे बुकिंग घेणे रद्द केले आहे. ज्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. त्या ठिकाणच्या मतदारांनी जर पर्यटन केंद्राकडे बुकिंगची चौकशी केली, तर त्यांची बुकिंग नाकारुन त्यांना मतदानाचं आवाहन केलं जातं आहे.



एकीकडे अनेक वेगवेगळे व्यवसायिक मतदान केल्यानंतर डिस्काऊंट आणि ऑफर्स देत आहेत. मात्र, पराशर कृषी पर्यटन केंद्रानं आर्थिक झळ सोसून मतदान न करता फिरायला येणाऱ्यांना नो एन्ट्री सांगितली आहे.

उद्या मतदानच्या दिवसाला लागूनच आणखी सुट्ट्या आहेत. विकेंड येत असल्यानं मुंबईबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, मतदानाचं कर्तव्य सोडून फिरायला येणाऱ्यांचं बुकींगच न घेण्याचा निर्णय पर्यटन केंद्र घेतला आहे.

आपण जर रविवार सोमवारच्या जोडून "सुट्टीचे" मुंबई बाहेर फिरायला जायचे नियोजन करत असाल तर माझ्याकडे बुकिंग मिळणार नाही. मी नाही बुकिंग घेतले तर आपण दुसरीकडे जाल. माझं आर्थिक नुकसान होईल पण मी माझ्या ठिकाणी राहून एवढं तरी नक्की करू शकतो. आपला देश बदलावा म्हणून आपण त्या प्रक्रियेत भागच घेणार नसू तर बदलायला हवा म्हणजे नेमका कसा हे हक्काने सांगण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, असे पराशर कृषी पर्यटन परिवाराचे मनोज हाडवळे यांनी म्हटले आहे.