तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे खरंच गाडी नाही का, असा प्रश्न विचारला, असता त्या म्हणाल्या की, "सुप्रिया सुळेंकडे गाडी नाही हे हास्यास्पद आहे. माझ्याकडे कंपनीची गाडी आहे."
एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर
तपास यंत्रणांच्या वापराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यावर करण्यासाठी दुसरे कोणतेच आरोप राहिले नाहीत, म्हणून ते अशी विधानं करत असावेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारी यंत्रणांचा वापर केला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेक शीर्षस्थ नेते राहिले नसते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं की, "ईडी, सीबीआयमध्ये एक आणि दोन क्रमांकाच्या अधिकाऱ्यांमध्येच वाद सुरु आहे. पाच वर्षात त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ईडी, सीबीआय, आरबीआय हे थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. तपास यंत्रणांचा वापर करण्याबाबतचं विधान त्यांचेच लोक करतात. या निवडणूक आली की त्यांना हे सूचतं."
मोदी दुष्काळ, बेरोजगारीऐवजी आमच्या कुटुंबावर बोलत आहेत
पंतप्रधान मोदींसह विरोधकांना बोलण्यासाठी दुसरे मुद्दे नसल्याने ते आता आमच्या कुटुंबावर भाष्य करत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी दुष्काळ, बेरोजगारावर बोलावं, अशी अपेक्षा होती. पण ते आमच्या कुटुंबावर बोलले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
...म्हणून पार्थबद्दल बोलतात
"पवार कुटुंबात काहीतरी चाललंय अशी कुजबूज कायम होते. पण माझ्या माहेरी काय चाललंय याची खबर मला नेहमीच असते. माझ्यासाठी माझं कुटुंब अतिशय महत्त्वाचं आहे. जगातील कोणताही व्यक्ती दादा आणि माझ्यात अंतर आणू शकत नाही. आम्ही चांगली टीम आहोत आणि आम्ही दहा वर्ष करुन दाखवलं आहे. दादा आणि माझ्याबद्दल अनेक वेळा बोलून बोअर झाले आहेत. त्यामुळे आता ते पार्थबद्दल बोलत आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
विजयसिंह मोहिते पाटलांवर अन्याय केला नाही
शरद पवार यांच्या भूमिकेमुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या जवळ गेले असा प्रश्नही सुप्रिया सुळेंना तोंडी परीक्षा कार्यक्रमात विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, "विखे पाटील आणि त्यांच्या मुलाबद्दल मी काही बोलू शकणार नाही. पण विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने कोणताही अन्याय केला नाही. पक्षात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना माढ्यातून तिकीट मिळणारच होतं. पण त्यांनीच नकार दिला. मात्र ज्यांनी पक्ष बदलला त्यांना तरी कुठे तिकीट मिळालं?"