Parli Nagarparishad Election Result 2025: परळी नगर परिषद निवडणुकीत (Parli Nagarparishad Election) दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar Faction) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी फेसबुक लाईव्ह करत खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना थेट लक्ष्य करत, पक्ष संघटन, उमेदवार निवड आणि भांडवलदारांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

Continues below advertisement

देवराव लुगडे म्हणाले की,  “या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या,” असे आवाहन त्यांनी बजरंग सोनवणे यांना केले आहे.

Parli Nagarparishad Election Result 2025: ...तर चांगल्या लोकांना सोबत घ्या

ते पुढे म्हणाले, अडचणीच्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढवायचा. आम्ही लोकांमध्ये जायचं, आम्ही दुश्मनी घ्यायची,  आंदोलन करायचे, अंगावर खोट्या केस घ्यायच्या, आम्ही एवढेच काम करायचं का? आणि निवडणुकीत आलेल्या दलाल लोकांना तुम्ही सोबत घेत असाल, पुन्हा आमच्या गोरगरिबांची ही भावना होऊ देऊ नका की हा भांडवलदारांचा, श्रीमंताचा पक्ष आहे. श्रीमंती आणि पैसा बघून इथे प्राधान्य दिले जाते. चाटुगिरी, भामटेगिरी, पुढे-पुढे करणाऱ्याला प्राधान्य दिले जाते ही आमची मानसिकता होऊ देऊ नका. कारण हा पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात परळीत पक्ष उभा करायचा असेल तर चांगल्या लोकांना सोबत घ्या,  असे खडेबोल देवराव लुगडे यांनी बजरंग सोनवणे यांना सुनावले आहे.

Continues below advertisement

Parli Nagarparishad Election Result 2025: परळी नगर परिषद निवडणूक निकाल, महायुतीचा दणदणीत विजय

दरम्यान, 21 तारखेला राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ठिकाणी सत्ता मिळवली असून, त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी यश मिळवले. परळी नगर परिषद निवडणूक माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. अखेर त्यांनी परळीचा गड राखत महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून दिले. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत असतानाच, निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत आठ दिवस तळ ठोकत जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष परळीच्या निकालाकडे लागले होते. मात्र, महायुतीने एकसंघ लढत देत विजय संपादन केला.

Parli Nagarparishad Election Result 2025: नगराध्यक्ष पदाचा निकाल

पद्मश्री धर्माधिकारी (महायुती – घड्याळ) : 28,091 मते

संध्या दीपक देशमुख (राष्ट्रवादी – शरद पवार गट, तुतारी) : 12,429 मते

सय्यद मैमुना हनीफ (काँग्रेस, पंजा) : 8,552 मते

महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

Parli Nagarparishad Election Result 2025:  नगरसेवक पदावर महायुतीचे वर्चस्व

35 जागांपैकी दोन जागा मतदानापूर्वीच महायुतीने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित 33 जागांवर झालेल्या निवडणुकीतही महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले.

Parli Nagarparishad Election Result 2025: पक्षनिहाय विजयी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 16

भाजप – 7

शिवसेना (शिंदे गट) – 2

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 2

काँग्रेस – 1

एमआयएम – 1

अपक्ष – 6

आणखी वाचा 

सिल्लोडमध्ये तुम्ही आमचं बिघडवू शकत नाही, पण आम्ही भोकरदनमध्ये तुमचं बिघडवलं; अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल