परभणी : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीला महिला उमेदवाराऐवजी तिचा पती आल्याने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी त्या पतीदेवासह पक्षाच्या स्थानिक नेत्यांचीही खरडपट्टी काढल्याची माहिती आहे. परभणीत घडलेल्या या प्रकाराची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) परभणीत भाजप नेते आणि सर्व उमेदवारांची बैठक घेतली. शहरातील कार्निवल हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. महायुती सरकारने केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन बावनकुळेंकडून करण्यात आलं.
दरम्यान, या बैठकीला भाजपच्या महिला उमेदवारांऐवजी त्यांचे पती हजर राहिल्याने बावनकुळे चांगले संतापल्याचं दिसून आलं. यावेळी बावनकुळे यांनी नेत्यांसह उमेदवारांच्या पतिदेवांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचंही समजतंय.
सोमवारी परभणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेवेळी स्टेजवर पतीऐवजी महिला उमेदवार असतील अशी सक्त ताकीद चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना दिल्याची माहिती आहे.
Parbhani Election : परभणीत भाजपचाच महापौर, बोर्डीकरांना विश्वास
परभणी शहरातील सर्व जागा आम्ही लढवत नसलो तरी ज्या जागा लढत आहोत त्या जागा शंभर टक्के जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. तसंच परभणीत महापौर हा भाजपचाच होणार असा विश्वास पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे, आज जरी महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असले तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ असंही त्या म्हणाल्या आहेत.
Parbhani Eknath Nagar : मतदानावरील बहिष्कार मागे
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करतायत, आश्वासनं देतायत. मात्र परभणी महापालिका क्षेत्रातल्या काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि याची एकच चर्चा झाली. गेली अनेक वर्ष साध्या मूलभूत गरजांपासून इथले नागरिक वंचित राहिले. त्यामुळे बहिष्काराचं अस्त्र या नागरिकांनी उपसलं.
परभणीतील एकनाथ नगरमधील नागरिक गेली 35 वर्षे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, पण समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांनी आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्धार केला.
एबीपी माझानं ही बातमी दाखवली. त्यानंतर लागलीच स्थानिक खासदार आणि काँग्रेसची नेतेमंडळी एकनाथ नगरमध्ये पोहोचली आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. अखेर नागरिकांनी मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.
ही बातमी वाचा: