अहमदनगर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार, अशी टीका पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे.


धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते नसून पक्षविरोधी नेते आहे. ते जेव्हापासून राष्ट्रवादीत गेले आहेत तेव्हापासून राष्ट्रवादीचा एक-एक पिलर ढासळत आहे. बीडमध्ये आधी राष्ट्रवादीचे पाच आमदार आहे, धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले आणि बीडमध्ये राष्ट्रवादी पूर्णपणे रसातळाला गेली, अशी टीका पंकजा मुडेंनी केली.


आमच्या उमेदवारांची पात्रता विचारता, मात्र ज्यांना (पार्थ पवार) दोन शब्द बोलता येत नाहीत त्यांची कधी पात्रता विचारत नाहीत, असा सवाल पंकजा मुंडेनी धनंजय मुंडेंना विचारला.



रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात कोण उत्कृष्ट नेता आहे, असं विचारल्यावर पार्थ किंवा रोहित हे महत्त्वाचं नाही. ते पवार आहेत हे महत्त्वाचं आहे. या धनंजय मुडेंच्या वक्तव्यावर बोलताना पवारांची किती चमचेगिरी करणार असा टोलाही पंकजा मुंडेनी लगावला.


अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या बरोबर भाजप आमदार या सभेला उपस्थित होते.