नितीन गडकरींनी केलेली विकासकामे पाहून अनेकजण त्यांच्यावर खूश आहेत. काही दिवसांपूर्वी संसदेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील गडकरींनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासून पंतप्रधानपदासाठी गडकरींच्या नावाची अधून-मधून मागणी होत आहे. आता त्यामध्ये अनुराग कश्यपची भर पडली आहे.
नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवणाऱ्या एका ट्वीटला रिट्वीट करत कश्यपने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदींपेक्षा नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय आहेत. सर्वच पक्षांमध्ये भ्रष्टाचार होत असतो. परंतु आता या भ्रष्टाचाराचे स्वरुप बदलले आहे. त्यानंतर अजून एक ट्वीट करत कश्यप म्हणतो की, भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा मी आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचार संपवणे शक्य नाही.
भारतीय कला विश्वात नरेंद्र मोदी समर्थक आणि नरेंद्र मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अभिनेत्री रत्ना पाठक यांच्यासह 600 कलाकारांनी एक पत्रक काढून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहान केले होते. त्यानंतर तीन दिवसांनी गायक शंकर महादेवन, अभिनेता विवेक ओबेरॉय, नाट्यकर्मी वामन केंद्रे, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह 907 कलाकारांनी एकत्र येत नरेंद्र मोदींचे समर्थन केले होते.