Niphad Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान झाले असून आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. निफाड विधानसभा मतदारसंघात (Niphad Vidhan Sabha Constituency) महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी दिली. निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


2009 च्या विधानसभा निवडणुकीत निफाडची लढत ही राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात झाली होती. अनिल कदम यांना 90 हजार 65 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. तर दिलीप बनकर यांना 56 हजार 920 मतं मिळाली होती. यानंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांचा सामना झाला. या निवडणुकीत अनिल कदम यांना 78 हजार 186 मतं मिळाली तर दिलीप बनकर यांना 74 हजार 265 मतं मिळाली. अवघ्या 3 हजार 921 मतांनी अनिल कदम यांचा निसटता विजय झाला होता. यानंतर दोन पराभवांचा वचपा दिलीप बनकर यांनी भरुन काढला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या बनकरांना 2019 च्या निवडणुकीत 96 हजार 354 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अनिल कदम यांना 78 हजार 686 मतं मिळाली.


दिलीप बनकर पुन्हा विजयी


राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवेळी दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी दिलीप बनकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनिल कदम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आता निफाड विधानसभा मतदारसंघातून दिलीप बनकर बाजी मारणार की अनिल कदम 2019 च्या पराभवाचा वचपा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निफाड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र, दिलीप बनकर 28 हजार 697 मतांनी विजयी झाले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Nashik West Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?


Nashik Central Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे हॅटट्रिक करणार की वसंत गीते पराभवाचा वचपा काढणार?