Nashik Central Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजल्यापासून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ (Nashik Central Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला. या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीतून (Mahayuti) भाजपने (BJP) पुन्हा एकदा विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वसंत गीते (Vasant Gite) यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत देवयानी फरांदे आपला गड राखणार की वसंत गीते धक्का देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 2009 मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नाशिक शहरातील मतदारसंघांचे विभाजन होऊन नाशिक मध्य मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातील सामाजिक व जातीय समीकरणे काँग्रेसला पूरक असली तरी 2009 सालच्या निवडणुकीत या मतदारसंघाने मनसेच्या बाजूने कौल दिला होते. वसंत गितेंनी मनसेकडून उमेदवारी करीत काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा 31 हजार मतांनी पराभव केला होता. परंतु, 2014 मध्ये मात्र भाजपच्या देवयानी फरांदे यांनी वसंत गितेंचा 28 हजार 287 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये वसंत गितेंनी माघार घेतल्याने या ठिकाणी देवयानी फरांदे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्यात लढत रंगली होती. परंतु, देवयानी फरांदे यांनी हेमलता पाटील यांचा 28 हजार 387 मतांनी पराभव केला होता.
देवयानी फरांदे विरुद्ध वसंत गीते थेट लढत
काँग्रेसच्या हेमलता पाटील यंदाही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र नाशिक मध्यची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. ठाकरे गटाने माजी आमदार वसंत गीते यांना तिकीट जाहीर केले. यामुळे हेमलता पाटील नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अंकुश पवार यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून माघार घेतली. आता या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. दुसरीकडे 2014 चा वचपा काढण्यासाठी वसंत गिते सज्ज झाले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा