नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सर्व जागांवर भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशाची आणि राज्याची राजधानी एनडीएने काबीज केल्याचं दिसत आहे. दिल्लीतील सातही जागांवर भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर असून मुंबईमध्ये देखील संपूर्ण सहा जागांवर भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 340 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 85 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 23, शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये मुंबईच्या 6 मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर असून या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आघाडीवर आहेत. मुंबई दक्षिण मतदारसंघातही काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा पिछाडीवर असून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे मनोज कोटक आघाडीवर आहेत तर मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत.

दिल्लीमध्ये दक्षिण दिल्ली मतदारसंघात भाजपचे रमेश बिधुरी आघाडीवर आहेत. पश्चिम दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश साहिब सिंग वर्मा यांचा विजय झाला आहे. वायव्य दिल्ली मतदारसंघात भाजपचे हंसराज हंस आघाडीवर आहेत. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या मिनाक्षी लेखी आघाडीवर आहेत. पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर आहे. ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपचे मनोज तिवारी आघाडीवर आहेत. तर दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघात भाजपचे हर्षवर्धन आघाडीवर आहेत.