परभणीत शरद पवारांची सभा सुरु असताना परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नितीन बगाटे या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवत असल्याने अगोदरच धनंजय मुंडे आणि त्यांच्यात वाद झाला होता. यात कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या सत्कारासाठी आणलेली तलवारही आयपीएस अधिकारी बगाटे वरती घेऊन जाऊ देत नसल्यामुळे कार्यकर्त्यांत आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी परत एकदा उठून खाली जात स्वतः तलवार घेऊन स्टेजवर नेऊन ठेवली.
यावेळी सभेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि पाकिस्तानमधून कांदा आयात करायचा. यावरून लोकांना उद्रेक झाला की त्यांना तुरुंगात टाकायचे हाच प्रकार स्वाभिमान नसलेल्या नेत्यांकडून सुरु असल्याची टीका पवार यांनी केली. देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये आल्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे. पण, ते नाशिकमध्ये येत असताना विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या जातायत हे लोकशाहीला धरुन नाही, अशी टीका पवारांनी केली.
सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती उदयनराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर टीकेची झोड उठवली.