मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघाचा हट्ट अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला आहे. सर्वेसर्वा शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरील हट्ट सोडला आहे. त्यामुळे जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.


शरद पवारांनी पुण्याची जागा लढवावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु आपण 2019 ची लोकसभा निवडणून लढवणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता ही जागा मिळवण्यात आपल्याला यश आल्याचं काँग्रेसच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

2014 लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत पतंगराव कदम पुण्याच्या जागेवर लढले होते. इथे भाजपच्या अनिल शिरोळे यांचा विजय झाला होता.

दरम्यान, पुण्याच्या जागेचा तिढा सुटला असला तरी अद्यापही सहा मतदारसंघावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादीने 50-50 टक्के जागावाटपाची मागणी केल्याची चर्चा आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितल्याचंही म्हटलं जातं. त्यापैकी पुण्याचा तिढा सुटल्याचं कळतं.