समीर दुधगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. समीर दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आपला भाजप प्रवेश निश्चित केला आहे.
समीर यांनी आपले शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केले आहे. भारतात परतल्यानंतर ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय वडील गणेश दुधगावकर यांच्या निवडणूक प्रचाराची सर्व यंत्रणा ते हाताळत होते.
गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मागच्या वेळी राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना तर यावेळी राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. यंदाही त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.
सुजय विखे पाटील आणि रणजित मोहिते-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची भाजपकडून लोकसभेसाठीची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे समीर यांचा भाजप प्रवेश होणार असल्याने त्यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला परभणीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सुजय विखे आणि रणजितसिंह मोहिते-पाटलांनी भाजप प्रवेश केला, मात्र राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच आणि विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतच राहिले. त्याच पद्धतीने समीर दुधगावकर यांचा प्रवेश होणार आहे. समीर भाजपमध्ये जातील मात्र गणेशराव दुधगावकर हे राष्ट्रवादीत राहणार आहेत.
सुजय विखे पाटलांनंतर आज गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.