मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. आता उद्या नागपूरमध्ये  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील चौथ्या मंत्र्याचं नाव समोर आलं आहे. नरहरी झिरवाळ हे 2019- 2024 या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते. 


नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद 


राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाच्या कोट्यातून शपथ घेण्यासाठी आमदार नरहरी झिरवाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळून 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्या निमित्तानं दुसरं नाव मंत्रिपदासाठी समोर आलं आहे. 


कोण आहेत नरहरी झिरवाळ?


नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आहेत. 1999 ते 2024, 2009 ते 2014, 2019-2024 या तीन टर्ममध्ये आमदार होते. आता ते चौथ्यांदा पुन्हा निवडून आले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. यावेळी त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणार हे स्पष्ट झालं आहे.  


अनिल पाटील, अदिती तटकरे वेटिंगवर 


बातमी प्रसिद्ध होईपर्यंतच्या अपडेटनुसार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असला  तरी फोन आलेला नव्हता. त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळातून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अजित पवार कुणाला संधी देणार? 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अजित पवार मंत्रिपदासाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नरहरी झिरवाळ यांचं नाव तर निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याचे संकेत नरहरी झिरवाळ यांच्या फोनच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. 


नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु 


नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. उद्या दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती आहे. 


इतर बातम्या :