मुंबई : महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं होतं. महाविकास आघाडीचे 48 पैकी 30 खासदार विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीनं 8 , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 9 आणि काँग्रेसनं 13 जागांवर विजय मिळवला होता. तर, महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला होता. यामध्ये भाजपला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता, त्याला प्रविण दरेकर यांनी दुजोरा दिला होता. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार कोण आहेत आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आले ते पाहणं महत्त्वाचं आहे. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे 8 खासदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.


1. सुप्रिया सुळे -बारामती


2. अमोल कोल्हे - शिरुर


3. धैर्यशील मोहिते पाटील- माढा 


4. भास्कर भगरे- दिंडोरी 


5- बाळ्यामामा म्हात्रे - भिवंडी 


6.बजरंग सोनावणे - बीड


7. अमर काळे- वर्धा


8. निलेश लंके -अहमदनगर 


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. दहा पैकी सातारा आणि रावेरच्या जागेवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर, भास्कर भगरे यांनी भाजपच्या भारती पवार, बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपच्या कपिल पाटील, बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे, अमर काळे यांनी रामदास तडस आणि निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. 


भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करत शरद पवारांच्या खासदारांचा विजय 


भाजपचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा बाळ्यामामा म्हात्रे यांनी पराभव केला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव करत भास्कर भगरे विजयी झाले होते. बजरंग सोनावणे यांनी बीडमधून पंकजा मुंडे यांना पराभूत केलं होतं.


विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार विजयी झाले. तर, मविआला मोठा फटका बसला. मविआला 49 जागांवर यश मिळालं होतं. 



इतर बातम्या : 


BJP : भाजप मविआला धक्का देणार, मिशन लोटस राबवणार? शरद पवारांच्या पक्षाचे खासदार संपर्कात, दरेकरांचा दुजोरा