नाशिक : नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पद एकाच वेळी भूषवलेले माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी उपमहापौर गुरमित बग्गा यंदा एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक हे शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार तर माजी उपमहापौर गुरमित बग्गा भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत.
नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या सत्ता काळात आणि मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेत महापौर पद भूषवलेले अशोक मूर्तडक आणि उपमहापौर पद भूषवलेले गुरमीत बग्गा हे नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करत आहेत.
अशोक मुर्तडक यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, माजी महापौर मुर्तडक यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे बंडखोरी करत अशोक मुर्तडक अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पुरस्कृत केलं आहे. माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी निवडणुकीच्या दरम्यान नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपने बग्गा यांना अधिकृत उमेदवारी दिली.
एकेकाळचे चांगले मित्र आणि नाशिक महानगरपालिकेत मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिकचा सर्वांगीण विकास करणारे महापौर आणि उपमहापौर पद भूषवणारे मुर्तडक आणि बग्गा यंदा मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाशिक मधल्या प्रमुख लढतील पैकी ही लढत देखील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार सुरु
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने सामने आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतर नंतर मंत्री दादा भुसे यांच्याकडून देखील नाशिकच्या गंगापूर भागात चौक सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या प्रचारासाठी मंत्री दादा भुसे हे प्रभाग आठ मध्ये दाखल झाले होते. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढत असून भाजपला शिंदे सेनेकडून जोरदार आव्हान उभे केले जात आहे. मंत्री दादा भुसे हे शहरात विविध प्रभागात जाऊन चौकसभा घेत आहेत माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे आणि भाजपला त्र्यंबकमध्ये जोरदार धक्का देणाऱ्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार ह्या देखील नाशिकमध्ये पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक रिंगणात आहेत. नाशिककर कोणाला निवडून देतात ते पाहावं लागेल.