Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निर्माण झालेल्या गोंधळाची थेट दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे.
नाशिकमधील सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात वादाचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मध्ये एबी फॉर्मच्या वाटपावरून झालेल्या गोंधळात सुधाकर बडगुजर यांच्याकडे तब्बल चार एबी फॉर्म कसे आले, कोणाला कुठून माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, कोण कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवणार होते, याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.
Nashik Mahanagarpalika Election 2026: उमेदवारी माघारीच्या दिवशी सिडकोत प्रचंड घडामोडी
नाशिक महापालिकेच्या सिडको विभागातील एकूण सहा प्रभागांमध्ये उमेदवारी माघारीचा अंतिम दिवस शुक्रवारी (दि. 2) होता. त्यामुळे सकाळपासूनच सिडको विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. अंतिम वेळ जवळ येताच राजकीय हालचालींना वेग आला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेविका हर्षा बडगुजर आणि दीपक बडगुजर या मायलेकांनी प्रभाग क्रमांक 25 मधील आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या प्रभागातील भाजपच्या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांनी उमेदवारी कायम ठेवत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
Nashik Mahanagarpalika Election 2026: वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक
या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. पक्षशिस्त आणि नियमांचे पालन करत हर्षा बडगुजर यांनीही प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे या प्रभागात भाजप पुरस्कृत उमेदवार भाग्यश्री ढोमसे यांचा मार्ग सुकर झाला.
Nashik Mahanagarpalika Election 2026: प्रभागनिहाय स्थिती
प्रभाग क्रमांक 25 मधून सुधाकर भिकाजी बडगुजर, साधना पवन मटाले हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर भाग्यश्री राकेश ढोमसे, प्रकाश गिरीधर अमृतकर हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत. तर प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक सुधाकर बडगुजर, भूषण सुरेश राणे, डॉ. योगिता अपूर्व हिरे, छाया देवांग हे भाजप उमेदवार आहेत. तर मुकेश शहाणे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Nashik Mahanagarpalika Election 2026: चौकशीकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, एबी फॉर्मच्या वाटपातील कथित गोंधळ, अंतर्गत वाद आणि बडगुजर–शहाणे संघर्षामुळे भाजपची मोठी नामुष्की झाल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी होणार असल्याने चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, दोषींवर कारवाई होते का? याकडे आता संपूर्ण नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा