नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिकमधून (Nashik District Vidhan Sabha Election 2024) मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पंधरा जागांसाठी 196 उमेदवार रिंगणात आहेत. फक्त तीनच ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने लढत आहेत. तर सात ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. नांदगाव, इगतपुरी, चांदवडमध्ये अपक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहेत.


देवळाली, नांदगावमध्ये महायुतीला डोकेदुखी 


जिल्ह्यात शिंदे गटाच्या वाट्याला नांदगाव आणि मालेगाव बाह्य या दोन जागा आल्या आहेत. तिसरी जागा देवळालीत राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे तेथे महायुतीच्या उमेदवारासमोर एकाच वेळी महाविकास आघाडी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी कडवे आव्हान निर्माण केले असतानाच अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचेही आव्हान निर्माण झाले आहे. नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांच्या विरोधात उबाठा गटाचे गणेश धात्रक रिंगणात असले तरी येथे अपक्ष समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे यांचेही आव्हान आहे. 


नाशिक शहरातील तीन मतदारसंघात महायुतीला तगडं आव्हान


नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या मतदारसंघात पूर्वमध्ये भाजपाच्या उमेदवाराविरोधात पूर्वाश्रमीचे भाजपाचेच गणेश गिते यांचे आव्हान आहे. मध्य मतदारसंघात भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्याविरोधात उबाठा गटाचे वसंत गिते यांनी आव्हान निर्माण केले असले तरी वंचितने येथे मुशीर सय्यद यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. त्यात येथील लढाईला हिंदुत्ववादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातही भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात उबाठाचे सुधाकर बडगुजर हे लढत देत असले तरी ऐनवेळी भाजपातून मनसेत दाखल झालेल्या दिनकर पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केल्याने येथील लढत तिरंगी आणि अटीतटीची बनली आहे. 


निफाड, बागलाणमध्ये चुरशीची लढत 


निफाड मतदारसंघात उबाठा गटाचे अनिल कदम आणि महायुतीचे दिलीप बनकर यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रहारने येथे गुरुदेव कांदे यांना उमेदवारी दिली असली तरी खरी लढत बनकर आणि कदम यांच्यातच दिसून येत आहे. बागलाणमध्ये विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याविरोधात दीपिका चव्हाण या पारंपरिक विरोधकांत लढत होत आहे. त्यात बोरसे यांच्याविरोधात भाजपातीलच काही मंडळी असल्याने ते आपली रसद दीपिका चव्हाण यांना पुरविल्यास येथे बोरसेंसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.


इगतपुरीत चौरंगी लढत


मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवारच दिलेला नाही. येथे एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांच्यासमोर एजाज बेग आणि शान ए हिंद यांचे आव्हान आहे. इगतपुरी मतदारसंघात विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे अजित पवार गटाकडून लढत आहेत. त्यांच्या प्रचाराची यंत्रणा बहुतांश ठेकेदारच हाताळत असल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने लकी जाधव यांनी उमेदवारी दिली आहे. बाहेरचा उमेदवार असल्याने काँग्रेससह इतर घटक पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच अपक्ष निर्मला गावित यांची उमेदवारी असल्याने आणि मनसेने काशीनाथ मेंगाळ यांना रिंगणात उतरविल्याने चौरंगी लढतीने विजयाचे गणित काहीसे अवघड बनले आहे.


मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार? 


सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे आणि उदय सांगळे अशी सरळ लढत आहे. त्यात पुन्हा जातीय समीकरणे येथे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. येवल्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे हे उमेदवार आहेत. बदललेल्या जातीय समीकरणांमुळे येथे काय होते हे पाहावे लागेल. दिंडोरीत महायुतीचे नरहरी झिरवाळ यांच्यासमोर शरद पवार गटाने सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुतारी वाजते की घड्याळाचा गजर होतो हे निकालानंतर कळणार आहे. कळवण-सुरगाण्यात नितीन पवार यांच्याविरोधात माजी आमदार जे. पी. गावित यांनी आव्हान उमे केले आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत तुल्यबळ लढती होत असल्या तरी जवळपास सर्वच चेहरे जुने आहेत. त्यामुळे पुन्हा मतदार जुन्याच चेहऱ्यांना निवडणार की नवीन बदल घडविणार? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क