पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार केला जात आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 


संजय राऊत म्हणाले की, व्यासपीठावर बसलेले सगळेच वाघ आहेत. रवींद्र धंगेकर आपल्यामुळे महाराष्ट्राला कसबा हा मतदारसंघ माहीत झाला. 288 मतदारसंघ आहेत. पण, 2 वर्षापूर्वी पोटनिवडणूक लढली आणि कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली. सगळ्या देशाचं कसबा मतदारसंघात लक्ष होतं.  हू इज धंगेकर म्हणणारे आता चंपा तिकड आहेत.  कसब्यातील नागरिक आधी घेतलेला निर्णय बदलणार नाहीत. त्यांना आपल्यातला माणूस आमदार म्हणून मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले.


जिस स्कूल में आप पढ़ते हो उस स्कूल के हम हेडमास्तर है


धंगेकरजी आपण शिवसेनेत आहात, असे मी मानतो. सत्तेवरची घाण उखडून फेकायची आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत.  पुण्यातील राजकीय कोयता गँग आपल्याला संपवावी लागेल. कोयत्यांनी कोयता संपवावा लागेल. आमच्याकडे अनेक पर्याय आहे. जिस स्कूल में आप पढ़ते हो उस स्कूल के हम हेडमास्तर है, अशी डायलॉगबाजी संजय राऊत यांनी केली.


अजित पवार, एकनाथ शिंदे राज्याचे दुश्मन


पुण्यात अशी गुंडागर्दी चालत नाही हे संपवावी लागेल.  कोयता गँग, गुंडगिरी, ड्रग्स अशी पुण्याची ओळख झाली आहे. याला जबाबदार कोण आहे? तर हे आमदार आणि खासदार आहेत. राज्यातलं दळभद्री सरकार घालवले पाहिजे. महाराष्ट्र सरकार विकलं गेलं आहे. याला जबाबदार अजित पवार, एकनाथ शिंदे आहेत.  मोदी-शाह यांना आपल्या राज्याची शान घालवायची आहे. गुजरातसमोर आपल्या राज्याला झुकवायचं आहे म्हणून हे प्रयत्न सुरु आहेत.  मोदींनी काल सभा घेतली. शिवाजी पार्कला दीड लाख खुर्च्या लावल्या होत्या. ५ हजार लोक सुद्धा उपस्थित नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींविरोधात बंड पुकारला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे हे राज्याचे दुश्मन आहेत. मुंबई पुण्याचं महत्व हे लोक संपवत आहेत, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.


अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई हरणार 


हे लोक लाचार आहेत, डरपोक आहेत, ईडीला घाबरून हे भाजपच्या तंबूत गेले आहेत. शरद पवार राज्याचे टोलेजंग नेते आहेत. महाराष्ट्राचा प्रचार संपला की, मोदी लगेच ब्राझीलला जाणार आहेत. पाच देश ते फिरणार आहेत. ट्रम्प निवडून आले ते यांच्यामुळेच आले आहे. कमला हॅरिस आल्या असत्या तरी त्या यांच्यामुळेच आल्या असत्या. अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई हरणार आहे. शेवटच्या दोन दिवसात पैशाचा पाऊस पडेल. पैशाच्या पावसात वाहून जाणारी जमात बेईमान असते. राज्यात याचं सरकार आलं तर आधी विदर्भ वेगळा करतील. नंतर मुंबई तोडतील, महाराष्ट्र संपवतील. महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न मोदी आणि शाह यांचं आहे हे व्यापारी आहेत, अशीही टीका संजय राऊत यांनी केली. 


आणखी वाचा 


मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ द्या