नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरुन ही माहिती देण्यात आली आहे.





लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर काल (25 मे) भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली. केंद्रीय सभागृहतील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली.


गडकरी आणि सिंह यांच्या समर्थनानंतर शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील अमित शाह यांच्या प्रस्तावास समर्थन दिले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा सोपवला होता. नरेंद्र मोदींच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी 16 वी लोकसभा विसर्जित करुन नरेंद्र मोदींना शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितलं होतं.


17 व्या लोकसभेची स्थापना 3 जूनच्या आधी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला आहे. तर एनडीएने एकूण 352 जागा जिंकल्या आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाणार हे लवकरच स्पष्ट होईल.