मुंबई : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. कार्यकाळानुसार ते राज्याचे 31 वे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याशिवाय एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांच्यापासून ते नितीश कुमार देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यांनतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यानंतर मोदींनी फडणवीस यांना थांबवून अभिनंदन केलं.
नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राज्यपालांंचं अभिनंदन स्वीकारुन देवेंद्र फडणवीस पुढे निघाले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आवाज देत थांबवलं. देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन स्वीकारलं. नरेंद्र मोदी यांनी हस्तोंदलन करत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून हा प्रसंग सुटला नाही. त्यांनी हे पाहताच एकच जल्लोष केला.
देवेंद्र फडणवीस 3.0 सुरु
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तिन्ही नेत्यांनी वंदन केलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्या विस्तारात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :