नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केले आहेत. 

Continues below advertisement

Narendra Modi : नरेंद्र मोदी काय म्हणाले?

महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.​भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

अमित शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील महायुतीला विजयी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार! हा विजय केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या, समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणाच्या धोरणाला जनतेने दिलेला आशीर्वादच आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो, असं अमित शाह यांनी म्हटलं.

Continues below advertisement

अमित शाह यांनी याच वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले भाजपाला सर्वाधिक जागा जिंकून देणारे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप महाराष्ट्रच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये महायुतीचं वर्चस्व

राज्यातील 242 नगरपरिषद आणि 46 नगरपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. भाजप  नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यातील 124 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. शिवसेनेनं 61 ठिकाणी नगरसेवक निवडून आणले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं  36 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत.

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी मात्र समाधानकारक झालेली नाही. महाविकास आघाडीत सर्वाधिक नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले आहेत. काँग्रेसनं 27 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झालेत. इतरांनी 20 नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला आहे.