Karad Nagar Parishad Election Result : सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आघाड्यांनी भाजपला धक्का दिला आहे. कराड येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं यशवंत विकास आघाडी आणि बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीनं एकत्र येत राजेंद्रसिंह यादव यांना उमेदवारी दिली होती. राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपचे विनायक पावसकर आणि काँग्रेसच्या झाकिर पठाण यांचा पराभव केला. राजेंद्रसिंह यादव यांचा विजय भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
Rajendrasinh Yadav : राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी
कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपनं पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांना उमेदवारी दिली होती.यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजेंद्रसिंह यादव यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवलं होतं. काँग्रेसनं झाकिर पठाण यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. कराड नगरपरिषद निवडणुकीत लोकशाही विकास आघाडी आणि यशवंत विकास आघाडीनं मोठं यश मिळवलं आहे. दोन्ही आघाड्यांचे मिळून 20 नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष म्हणून राजेंद्रसिंह यादव विजयी झाले आहेत.
कराड नगरपरिषद निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव 9735 मतांच्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत. राजेंद्रसिंह यादव यांना 24096 मतं मिळाली. तर, विनायक पावसकर यांना 14361 मतं मिळाली. कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली. या लढतीत राजेंद्रसिंह यादव यांनी बाजी मारली.
कराडमधील पक्षीय बलाबल
कराड नगरपरिषदेच्या एकूण 31 जागा आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून राजेंद्रसिंह यादव विजयी झाले. यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसबा घेतली होती. कराड नगरपालिकेच्या 31 जागांपैकी 13 जागा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही विकास आघाडीनं 13 जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कराड नगरपालिकेत मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वात यशवंत विकास आघाडी म्हणून कराडमध्ये उमेदवार उभे केले होते. यशवंत विकास आघाडीला 7 जागांवर विजय मिळाला. भाजपनं जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वात 10 जागांवर विजय मिळवला. तर, कराडमध्ये एक अपक्ष विजयी झाला आहे.
दरम्यान, कराड शेजारच्या मलकापूर नगरपरिषदेत मात्र भाजपनं विजय मिळवला आहे. मलकापूरमध्ये भाजपचे तेजस सोनावले विजयी झाले तर 18 नगरसेवक पक्षाचे निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार आणि एक अपक्ष विजयी झाला. याशिवाय सातारा जिल्ह्यात भाजपनं फलटण, वाई, सातारा, रहिमतपूर, म्हसवड नगरपरिषद आणि मेढा नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणला आहे.