मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी यांचे योगदान काही नाही. शिवसेना वाढीसाठी मी सर्व काही केलं आहे. हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, असे भाजपचे खासदार  नारायण राणे यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली आहे.

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमध्ये केलेले वक्तव्य जनतेला पटलेलं नाही. हे मैत्रीच्या गप्पा मारतात मात्र मैत्रीचा प्रामाणिकपणा यांनी ठेवला आहे का? युती करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करतात. मैत्रीचं पावित्र्य यांनी जपलं आहे का?  भाजपला सल्ला देण्याचा यांना अधिकार आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

मी जिथं जातो त्या पक्षाचे नुकसान होते असे उद्धव ठाकरे म्हणाले मात्र मी शिवसेनेत काम केले. काँग्रेसमध्येही मी प्रचार प्रमुख होतो. तिथंही पक्षप्रमुखाने सांगितलेलं काम केली. मी बाहेर येण्याने त्या पक्षाचे नुकसान झाले, असे राणे म्हणाले.

माझ्यावर टीका करावी आणि मी स्वस्थ बसून ऐकावं असा नारायण राणे नाही. माझ्या मनात भरपूर काही आहे. मात्र ते वेळ आल्यावर बोलेन, असेही राणे म्हणाले.

राणे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांच्या आधीपासून शिवसेनेत अॅक्टिव्ह होतो. शिवसेनेच्या वाढीसाठी यांचे योगदान काही नाही. हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते शिवसेनेत आले. आम्ही आधीपासून काम केलं आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा हा जळफळाट आहे. त्यांनी कोकणासाठी काय केलं. त्यांच्या मंत्र्यांनी काय कामं केली यावर बोलावं. कोकणाचा अभ्यास तरी आहे का यांना आणि यांच्या लोकांना. कोकणात येऊन कोकणी माणसावर आणि नारायण राणेंवर टीका केलेली लोकांना आवडणारे नाही, असेही राणे म्हणाले.

शिवसेनेत नाव घेण्यासारखं काही शिल्लक नाही. आक्रमकता कुणाबरोबर करावी हे देखील महत्वाचे आहे. आता बरोबरीचे कुणी शिल्लक राहील नाही.

मी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री जे सांगतील ते पाळलं जाईल. शिवसेनेत जसं एडजेस्ट झालो, काँग्रेसमध्ये जसे एडजेस्ट झालो तसेच भाजपमध्ये देखील एडजेस्ट होईल, असेही राणे म्हणाले. शिवसेनेने टीका केली तर मात्र उत्तर दिलं जाईल, असेही राणे म्हणाले.