Nanded Lok Sabha By Election नांदेड : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत केंद्रीय निवडणूक आयोगानं  नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं नांदेडची जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणं या जागेवर वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपनं देखील नांदेडच्या जागेसाठी तयारी सुरु केली असून माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी  करण्यात येत असल्याची माहिती आहे. 


वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं जागा रिक्त 


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ही जागा भाजपच्या ताब्यातून मिळवली होती. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. वसंतराव चव्हाण यांना 528894 मतं मिळाली होती. तर, प्रताप पाटील चिखलीकर यांना 469452 मतं मिळाली होती. वसंतराव चव्हाण यांनी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि देगलूर या मतदारसंघात आघाडी घेतली होती.तर, प्रताप पाटील चिखलीकर यांना भोकर आणि मुखेडमध्ये आघाडी मिळाली होती.  अशोक चव्हाण हे भाजपमध्ये असून देखील काँग्रेसनं नांदेडची जागा जिंकली होती. मात्र, 26 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालं. यामुळं ही जागा रिक्त झाली. 


भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या नावाची चाचपणी 


माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण सध्या भाजपमध्ये आहेत. अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व 2014 मध्ये केलं होतं. अशोक चव्हाण यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशोक चव्हाण यांना असलेला अनुभव पाहता भाजपकडून नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 


काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी 


केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसोबत नांदेडच्या लोकसभेच्या जागेची पोटनिवडणुकीची घोषणा केली. या घोषणेनंतर काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड काँग्रेस कमिटीनं रवींद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारस पक्ष नेतृत्त्वाकडे केली होती. 


नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 


अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 



मतदान  :20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर  2024


इतर बातम्या : 



Man Vidhan Sabha Election 2024 : माणचा मानकरी कोण होणार? जयकुमार गोरेंविरोधात कोण लढणार? शरद पवारांच्या निर्णयावर मविआची रणनीती ठरणार