नांदेड : नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या लोहा नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून हे 'कमळ' फुलले आहे.

प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेचे आमदार असले, तरी त्यांनी सुमारे वर्षभरापासून उघडपणे भाजपसाठी काम सुरु केलं होतं. लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला. या प्रयत्नांना आज यश मिळालं. हा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याची प्रतिक्रिया आमदारांनी दिली आहे.

भाजपचे गजानन सूर्यवंशी थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर 17 पैकी 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

लोहा नगरपालिका पूर्वी मनसेच्या ताब्यात होती, पुढे मनसेचे सर्व सदस्य काँग्रेसमध्ये गेले. लोहा नगरपालिकेच्या प्रचारासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मैदानात उतरले होते, पण जनतेने त्यांना नाकारले.

नांदेड : लोहा नगरपरिषद (एकूण जागा 17)

भाजप 13 जागा

काँग्रेस 4 जागा

नगराध्यक्ष : गजानन सूर्यवंशी (भाजप)

राज्यातील सहा विविध नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दोन  नगरपंचायतीसह एका नगरपरिषदेवर विजय मिळवला आहे. नांदेडची लोहा नगरपरिषद, जळगावची शेंदुर्णी नगरपंचायत आणि नागपूरची मौदा नगरपंचायतीवर भाजपचं कमळ उमललं. यवतमाळ, नांदेड, नागपूर, वाशिम, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि उर्वरित सहा नगरपरिषदांचा निकाल जाहीर झाला.