Nana Paotle : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result) काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले (Nana Patole) यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस (Congres) सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोलेंचा इशारा -
ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठांना कळवलं आहे, त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आमचा सगळ्या आमदारांवर विश्वास होता, पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला. आम्ही जी स्टेटर्जी केली, त्याला देखील हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय.
भाजपवर निशाणा -
घोडाबाजरा करणारी लोक भाजपची आहेत, पण जनतेच्या दालनात हे आता उतरणार आहेत. आम्ही ह्या आधी सांगत होतो की हे लोक राज्याला लुटत आहेत, कर्जबाजरी केलं आहे. ह्या लोकांनी महागाई केली आणि जनता ह्या लोकांना माफ करणार नाही, कॅगचा तसा रिपोर्ट आहे. भाजपच्या लोकांना निवडून दिलं, पण ह्या लोकांना कसा काळिमा लावला हे नागरिकांनी पाहिलेय. भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैश्यावर बोलत आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
मागील 10 वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला दिला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे, असे पटोले म्हणाले.
पुढच्या आठवड्यात काँग्रेसची बैठक -
19 जुलै 2024 रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जागावाटपा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेत निवडणुकीत जे आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची इतर नेते मागणी करणार आहे. या मागणीनंतर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे.