Mumbai Legislative Council Election : मुंबईतील विधान परिषदेच्या दोन्ही जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळं भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाल्यानं चुरस निर्माण झाली होती. 


उत्तर भारतीय राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपचे मराठी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा होती. त्यात काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं सुरेश कोपरकरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांची बरीचशी भिस्त ही नाराज नगरसेवकांवर होती. पण आता कोपरकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळं विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मुंबईत होणारी निवडणूक बिनविरोध होणार आहे. 


विधान परिषदेसाठी वरळी विधानसभेचे शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde)  यांच्या नावावर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. आता विधानसभा सदस्याची एक जागा रिकामी होत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेच विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि मिलिंद नार्वेकर, राहुल कनाल आणि सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती. मात्र, या जागेसाठी सुनील शिंदे यांचं नाव शिवसेनेतून फिक्स झाल्याचं सांगितलं जात आहे. 


पाहा व्हिडीओ : मुंबईतील विधान परिषद निवडणूक बिनविरोध, अपक्ष सुरेश कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे



दरम्यान, महापालिका स्वराज्य संस्थामधून शिवसेनेचा एक आमदार विधानपरिषदेवर पाठवला जातो. या जागी रामदास कदम यांना 2016 साली पाठवले होते. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचं सांगितलं जातं आहे. रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच शिवसेनेतून तरुण नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात आता सुनील शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.


कोण आहेत सुनील शिंदे? 


शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. 2007मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली होती. 2015मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर


महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे.  या निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे प्रत्येक पक्ष आपआपलं बळ दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार हे निश्चित आहे. 


दहा डिसेंबरला मतदान


निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होईल.


सहा जागांसाठी मतदान होणार



  • रामदास कदम, शिवसेना, मुंबई

  • भाई जगताप, काँग्रेस, मुंबई

  • सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर

  • अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार

  • गिरिश व्यास, भाजप, नागपूर

  • गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना अकोला, बुलढाणा, वाशिम


दोन जागांसाठी अद्याप मतदान नाही



  • प्रशांत परिचारक, भाजप, सोलापूर

  • अरूणकाका जगताप, राष्ट्रवादी, अहमदनगर


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा