मुंबई : मुंबई फक्त महाराष्ट्राचीच राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो याच मुंबई शहराचा.देशातील एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 25 टक्के उत्पादन हे एकट्या मुंबईतून होतं. या व्यतिरिक्त समुद्रीमार्गे होणाऱ्या व्यापारातही मुंबईचं स्थान देशभरात अव्वल आहे.
टुरिझम, फिल्म इंडस्ट्री, फुड इंडस्ट्री अशा अनेक व्यवसायांमुळे अनेक मुंबईकरांच्या घरात चूल पेटते. पण, इतकं सगळं देऊनही मुंबईला काय मिळतं? मुंबईकरांचा असा आरोप आहे की मुंबईच्या विकासासाठी हवा तसा निधी केंद्राकडून कधीच मिळाला नाही. पक्ष कोणतेही असो,सरकार कुणाचंही असो, मुंबईवर होणारा अन्याय कायम राहिला. मुंबईलाही वेळोवेळी या धोरणाचा फटका बसला. मुंबईची ही अवस्था गल्लोगल्ली फिरताना सहज जाणवते. मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला याबाबत काय वाटतं? वाचा मुंबईचा हा स्पेशल रिपोर्ट.
मुंबईला केंद्राकडून पैसे परत मिळतात का?
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून संपूर्ण देशाला मिळणाऱ्या पैशांपैकी 30 ते 35 टक्के रक्कम मुंबईतून जाते. तर 2006-07 किंवा 2008-09 मध्ये केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला केंद्राकडून केवळ 12 ते 18 टक्के रक्कम परत मिळाली. उर्वरित रक्कम इतर राज्यात खर्च करण्यात आली. मात्र, आता आलेल्या नव्या आकडेवारीत चित्र बदलले आहे. 2021-22 मध्ये केंद्राने सुमारे 70 टक्के रक्कम महाराष्ट्राला दिली.
मुंबईचे स्थानिक लोक म्हणतात की मुंबई भारतासाठी मोठ्या भावासारखी भूमिका बजावतो. इथे एक कमावता भाऊ आहे, जो संपूर्ण भारताला पोसतोय असं मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा आजच्या घडीला इथे येत नसल्याचे लोक म्हणाले. तर काहींनी फडणवीस-शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या घडामोडी निष्फळ वाटतात. आता मुंबईचा पैसा परत मिळत असून सरकार जनतेच्या हितासाठी खर्च करत असल्याचे काही लोक सांगत आहेत.