मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या वेशीवर मुलुंड हा मतदारसंघ आहे. 1990 पासून म्हणजेच गेली 28 वर्ष मुलुंड विधानसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंड विस्तारले आहे. मराठीच्या खालोखाल गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या अधिक असलेला हा मतदारसंघ भाजपचा भक्कम गड आहे. गेली 30 वर्ष इथे भाजपचा चेहरा आहेत ते सरदार तारासिंह. एक कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार या प्रवासादरम्यान सामाजिक कार्यामधून सरदार तारासिंह यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलुंड मतदारसंघात गल्लीतील छोटे रस्ते, सार्वजनिक आरोग्याच्या सोयीसुविधा, इथल्या उद्यानांचा विकास अशी अनेक कामं तारासिंह यांनी केली आहेत. आपल्या याच कामांच्या जोरावर 1999 पासून सलग 4 विधानसभा निवडणुकांमध्ये ते इथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याआधी 1984 ते 1999 या कालावधीत ते मुंबई महानगरपालिकेवर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठीही नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी इथल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. कारण तारासिंह यांच वाढतं वय हा इथल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. या विभागातील यंदाच्या आमदारकीचे प्रबळ दावेदार समजले जाणारे मनोज कोटक आता खासदार बनल्याने इतर भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये येथे उमेदवारीसाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. मात्र यंदाही तारासिंह यांनी आपल्या विधानसभा उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. त्यांची कामंही सुरूच आहेत. त्यामुळे यंदाही मुलुंडमधून आपणच निवडणूक लढवणार असा तारासिंह यांचा दावा आहे. खासदारकीचं तिकीट कापलं गेल्यामुळे किरीट सोमय्या इथून आपल्या पत्नीसाठी विधानसभेचं तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचीही एक चर्चा आहे. काँग्रेसमधून चरणसिंह सप्रा पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीकडून नंदकुमार वैती तर वंचितच्या उमेदवाराचा शोध अजूनही सुरू आहे. मनसेचं निवडणूकीबाबत चित्रच स्पष्ट नसल्याने त्यांचे उमेदवार सत्यवान दळवी कृष्णकुंजच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रभाकर शिंदे या मतदारसंघातून लढले होते, परंतु सध्या शिवसेनेकडे या मतदारसंघात एकही तगडा उमेदवार नाही. मुळात भाजपचं प्राबल्य पाहता शिवसेनेने इथून कधी फारसा जोर लावलाच नाही, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मुलुंडची ओळख असलेला मुलूंड टोलनाका हा मात्र स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरणारा आहे. इथल्या हरिओम नगरमधील मुलुंडवासियांनाही टोल भरून ये-जा करावी लागते. त्यात ज्यांना पास दिलेला आहे त्यांचाच काय तो अपवाद. 45 चौ.किमीच्या परिसरातील मुलुंडचा बराचसा भाग हा जंगलानं वेढलेला आहे. मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा मुद्दादेखील आहेच. त्यामुळे यंदा मुलुंडवासियांसाठी विरोधक काय मुद्दे घेऊन मैदानात उतरतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी सरदार तारासिंह, भाजप – 93,850 चरणसिंह सप्रा, काँग्रेस – 28,543 प्रभाकर शिंदे, शिवसेना – 26,259 सत्यवान दळवी, मनसे – 13,432 नंदकुमार वैती, राष्ट्रवादी – 4,880 नोटा – 1,748 मतदानाची टक्केवारी – 57.46 टक्के