पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात सभांचा सपाटा लावणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे, असा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला. राष्ट्रवादीने राज ठाकरेंना दिलेली सुपारी जमिनी किंवा पैशांच्या स्वरुपात नाही, तर विधानसभेच्या 25 जागांची आहे, असा आरोप संजय काकडेंनी केला.

पुण्यातल्या भिगवणमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाहांची सभा पार पडली, यावेळी संजय काकडेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

'या लोकांना इतका धसका बसला आहे, की यांनी भाड्याने आणि सुपारी देणं सुरु केलं आहे अमित भाई. एक राज ठाकरे नावाचा व्यक्ती आहे. त्याला सुपारी दिली. सुपारी देणं म्हणजे पैसे देणं, जाग देणं... तर यांनी नवीन सुपारी दिली, आम्ही तुझे 25 सभासद विधानसभेवर पाठवू. तुझ्यासोबत युती करु, 25 ते 30 जागा तुला विधानसभेच्या देऊ.' असं आमिष राष्ट्रवादीने राज ठाकरेंना दिल्याचा दावा संजय काकडेंनी केला.


'आपल्या मोदीसाहेबांबद्दल, अमित शाहांबद्दल नाही ते वायफळ बोलतो. असा व्यक्ती बोलतो, ज्याचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, मुंबईत एक नगरसेवक, पुण्यात दोन नगरसेवक, नाशिकला चार नगरसेवक. ज्यांना स्वतःचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत, ते आपले उमेदवार काय पाडणार?' असा सवाल करत संजय काकडेंनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.