Madhya Pradesh CM : भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा (Madhya Pradesh Chief Minister) निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे. मोहन यादव (Mohan Yadav) आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. भाजपच्या विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झालं.


3 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आलेय. मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेय. मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत भाजपने देशभरातील लोकांना चकीत केलेय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.






मध्य प्रदेशमध्ये दोन उप मुख्यमंत्री -


दरम्यान, मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झालं असताना, मध्य प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री करण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील. तर केंद्रात कृषीमंत्री असलेले नरेंद्रसिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असतील.


शिवराज सिंह चौहान यांचे घेतले आशीर्वाद   -


विधीमंडळ गटनेता ठरवण्याच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मोहन यादव यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आशीर्वाद घेतले. शिवराज सिंह यांनीही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे. मोहन यादव यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी आहे. 2020 मध्ये त्यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते 2023 पर्यंत मुख्यमंत्री पदावर पोहचले आहेत.