मनसेला केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात रस आहे. लोकसभा निवडणूक लढण्यास मनसे इच्छुक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र लोकसभेच्या रिंगणात उतरलं नाही, तरी सरकारला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचं म्हटलं जातं.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात येतील त्यांना सोबत घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या विरोधी भूमिकेमुळे मनसेच्या आघाडीप्रवेशाला खीळ बसू शकते.
तोंडी परीक्षा : महाआघाडीत मनसेला स्थान नाही : अशोक चव्हाण
राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांच्या पक्षाचे विचार काँग्रेसशी जुळत नाही, त्यामुळे महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं अशोक चव्हाण यांनी 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या विशेष कार्यक्रमात पुन्हा स्पष्ट केलं होतं.
'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा' असं लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात राज ठाकरे सभा घेणार आहेत. यामध्ये राज कोणता मोठा निर्णय घेणार आणि तो काय असणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.