महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2019 09:08 AM (IST)
'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा' असं लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
मुंबई : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे येत्या शनिवारी मुंबईत सभा घेणार आहेत. 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा' असं लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नुकतंच भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली, तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे नेमका कोणावर आघात होणार याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादीसोबत महाघाडीत येण्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचं म्हटलं जातं. त्यात शुक्रवारी मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत' असं सांगितलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीची दारं मनसेसाठी उघडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. VIDEO | पाकिस्तानला चर्चा हवी असेल तर अगोदर त्यांनी आपल्या जवानाला सोडावं : राज ठाकरे दरम्यान, 'भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो' असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. तर कोल्हापुरातील सभेत राज ठाकरेंनी 'पुलवामा हल्ला हा मोदी सरकारने घडवून आणला असू शकतो. पुलवामातले शहीद हे राजकीय बळी असू शकतात' असा घणाघात केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायुसेनेने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवरुन सरकारला प्रश्न विचारला होता. सरकारने एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगावा, नाहीतर राज ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य असू शकतं असं म्हणत राज ठाकरेंची बाजू एकप्रकारे उचलून धरली होती. पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल त्यांनीच उचलावं. आपल्या वैमानिकाला सोडावं आणि सीमेवरचा गोळीबार थांबवावा, तसं घडलं तरच म्हणता येईल इम्रान खान यांचा हेतू स्वच्छ आहे, असं राज ठाकरे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना म्हणाले होते.