VIDEO | धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव करणे हे एकमेव लक्ष्य : अनिल गोटे | एबीपी माझा
धुळे लोकसभा निवडणुकीत डॉ .सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं अनिल गोटे यांनी जाहीर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. आमदार अनिल गोटे हे धुळे शहरातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. एकाच पक्षाचे असलेले अनिल गोटे आणि सुभाष भामरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.
आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा निवडणूक जरूर लढवावी, त्यांनी आपली डिपॉझिट देखील वाचवून दाखवावी असं आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावर अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांचं हे विधान म्हणजे सत्तेची गुर्मी असल्याची प्रतिक्रिया दिली.
अनिल गोटे यांनी घेतली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट
धुळे महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने नाराज असलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत भाजवविरोधात लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यात भाजप उमेदवाराचा पराभव करणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतं.
VIDEO | राजकीय हालचालींना वेग, अनेक विरोधक शरद पवारांच्या भेटीला | मुंबई | एबीपी माझा
शरद पवारांना माझी भूमिका सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मला कशी मदत करायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचंही गोटे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणावरुन वाद झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा 'तेलगीचा मित्र' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने अनिल गोटे वैर विसरुन शरद पवारांच्या भेटीला गेले होते.
भाजप-अनिल गोटे वाद?
आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमधून डावलल्याने त्यांनी नव्या 'लोकसंग्राम' पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं. त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांचाही पराभव झाला. मतदारांनी गोटे यांना नाकारलं होतं.