Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : पक्षासाठी काम करण्यापेक्षा, व्यक्तिद्वेषाने पछाडलेली ही माणसं आहेत, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांसह निलेश लंके आणि विवेक कोल्हेंवर टीका केली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी थोडी तरी शरम बाळगली पाहिजे, स्वतःला काँग्रेस नेते समजतात, मात्र पक्षाला एकही जागा घेऊ शकते नाही असा टोलाही विखेंनी थोरातांना लगावला. तसेच दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. यातूनच त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध होते असंही विखे म्हणाले. त्यामुळं या तिघांनी देखील स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करणे गरजेचे आहे, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला. 


महायुतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळेल 


काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मविआचे उमेदवार निलेश लंके यांना मदत केल्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील लोकसभा निवडणुका आता संपल्या असून, त्यानंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भरभरून एनडीएला मतदान केले आहे. चारसो पारची घोषणा आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे. तसेच महायुतीलाही महाराष्ट्रात घवघवीत यश मिळेल असा विश्वास आहे. एक्झिट पोल आले आहेत राजकीय विश्लेषक बोलत आहेत मात्र सर्वांचे उत्तर चार तारखेला आपल्या समोर येईल असेही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.


अहमदनगरची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार 


महाराष्ट्रात महायुतीला घवघवित यश मिळणार आहे. एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषक सध्या विश्लेषण करत आहेत. मात्र, सर्वांचे उत्तर चार तारखेला मिळणारच आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा आम्ही जिंकणार आहोत हा विश्वास होता. सोशल मीडियातून जनतेमध्ये विष पेरणी करण्याचा कार्यक्रम झाला. पण शेवटी जनतेला कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही आमचे नेते नरेंद्र मोदी त्यांचं नेतृत्व, ज्या ज्या उमेदवाराला मिळाले अथवा पक्षाला मिळाले त्यात डॉ. सुजय विखे यांनाही त्यांचा आशीर्वाद आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेही मार्गदर्शन आहे. या जोरावर अहमदनगरची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे


लंके काय म्हणतात याला माझ्या दृष्टीने महत्व नाही


सुपा येथे झालेली अतिक्रमण हटाव मोहीम ही सूडबुद्धीने झाल्याचा आरोप करत मविआ नेते निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना लंके काय म्हणतात याला माझ्या दृष्टीने महत्व नाही असं राधाकृष्ण विखे म्हणाले. ही कारवाई केवळ सुपा येथेच नाही तर संपूर्ण राज्यात सुरु आहे. जिथं अतिक्रमणामुळं जनतेची गैरसोय होती तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्याबाबत वेगळं वाटण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांवर सुरु केला आहे. त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले.


अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती, आचारसंहिता संपल्यानंतर आढावा घेणार 


अहमदनगर जिल्ह्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे, पाणी आणि चाऱ्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे बैठका घेण्यासाठी परवानगी मागितली असता, चार तारखेपर्यंत ती मिळणार नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. चाऱ्यासंदर्भात पशुसंवर्धन खात्याकडून उपायोजना केल्या आहेत. प्रशासनाकडून पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर स्वतः आढावा घेणार असल्याचं देखील विखे यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Prakash Ambedkar: विखे-पाटील पितापुत्र गुप्तपणे दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट