बारामती : मावळ लोकसभा मतदार संघात यंदा तिसरी निवडणूक पार पडत आहे. 2009 साली निर्माण झालेल्या या मतदार संघात सलग दोनवेळा शिवसेनेचा भगवा फडकला. लोकसभेत माजी खासदार गजानन बाबर यांनी मावळचं पहिल्यांदा नेतृत्व केलं तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा निवडून लोकसभेत पोहोचलेत. 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत कोणत्याच मोठ्या नेत्याने इथून नशीब अजमावले नसलं तरी यंदा मात्र थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच प्रतिष्ठा पणाला लागण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ इथून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पिंपरी चिंचवडमधील निर्धार परिवर्तन यात्रेत तसे संकेत देताना, शरद पवार आणि अजित पवार हे तुमच्यासाठी झिजलेत, आता त्यांना देण्याची वेळ आली आहे, तर मावळ लोकसभेसाठी त्यांना आशीर्वाद द्या, असं 'हात' जोडून मुंडेंनी जाहीर आवाहन केलं.

दुसरीकडे मावळ लोकसभा मतदार संघातील कार्यक्रमात अजित पवारांसोबत पार्थ मंचावर दिसू लागला आहे. शरद आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर असो की नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर पार्थ पहिल्यांदाच झळकला. एका मागे एक घडणाऱ्या घडामोडी पार्थ पवारच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत आहेत. त्यामुळे यंदा सेनेच्या बाणाला काटे भेदावे लागणार आहेत, हे नक्की.

स्थानिक भाजप-शिवसेना आणि पक्षातील अंतर्गत गटबाजी पाहता पार्थला उमेदवारी देणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास किंवा ते स्वतंत्र लढल्यास काय परिस्थिती राहील ते आधी पाहुयात. महायुती झाल्यास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे त्यांचे उमेदवार असतील. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासूनचे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अन 2014 मध्ये त्यांच्याकडून पराभूत झालेले भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे महायुतीचा प्रचार करतील का? याची शाश्वती आत्ता तरी कोणीच देऊ शकत नाही.

भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्यास बारणे सेनेच्या तिकिटावर लढतील हे निश्चित असलं तरी बारणेंचा 'काटा' काढण्यासाठी जगताप तेंव्हा कोणतीही खेळी खेळू शकतात. बारणे-जगताप यांच्यामधील या विस्तवाचा फायदा पवार घेऊ इच्छितात. तसेच पिंपरी चिंचवड असो की मावळ येथील अंतर्गत गटबाजीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला 2009 आणि 2014 च्या लोकसभेत बसला आहे. विभागलेले हे गट एकजूट करण्यासाठी पवार पार्थचं निमित्त साधू शकतात. परिणामी शरद पवारांची प्रतिष्ठा इथं पणाला लागणार आहे. हे पाहता महायुती झाल्यास इथं दुरंगी अन भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्यास इथं तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत.

विविधतेनं नटलेला मावळ परिसर, प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार!
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघाची ही राजकीय परिस्थिती झाली. पण निसर्गाने नटलेल्या या मतदार संघांची अनेक वैशिष्ट आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय महामार्ग नंबर चार अर्थात जुना पुणे-मुंबई महामार्ग याच मतदार संघातून जातो. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कर्नाळा पक्षी अभयारण्य अशी पर्यटन स्थळं, एकविरा देवी, महडचा अष्टविनायक गणपती, चिंचवडचा मोरया गोसावी, देहूचे संत तुकाराम महाराज, शिरगावचे प्रति शिर्डी, देहूतील धम्म भूमी अशी धार्मिक स्थळं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले लोहगड, राजमाची, कर्नाळा, विसापूर असे अनेक किल्ले तर कार्ला लेणी, भाजे लेणी, कोंढाणा लेणी, घोरावडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवाही या मतदार संघाला लाभला आहे. या मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती ही तशी विचित्रच आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदार संघांनी बनलेला हा मतदार संघ. पिंपरी, चिंचवड हा भाग औद्योगिक तर मावळ इंद्रायणी भात आणि गुलाब शेती साठी प्रसिद्ध. तळ कोकणात असलेले कर्जत उरण आणि पनवेल हे कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे विधानसभा मतदार संघ. या मतदार संघातील मतदार हा 60 टक्के ग्रामीण तर 40 टक्के शहरी आणि निमशहरी भागात राहतो. कर्जत, उरण भागात आदिवासी समाजाचे प्रमाणही लक्षणीय आहे. मतदार संघाची ही परिस्थिती पाहता उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक होणार आहे.

2014 च्या मावळ लोकसभेतून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. मात्र अवघ्या सहा महिन्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक मात्र भाजप-शिवसेनेनं स्वतंत्र लढली. तेंव्हा चिंचवड, मावळ आणि पनवेलमध्ये भाजपचे पिंपरी आणि उरणमध्ये शिवसेनेचे तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार झाले. कधी नव्हे ते पिंपरी चिंचवड आणि पनवेल या दोन महानगरपालिका तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि उरण या नगरपरिषदा भाजपने काबीज केल्या. कर्जत, खोपोली, माथेरान या नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आली आहे. तर खालापूर नगरपंचायत ही शेकापकडे आणि वडगाव मावळ मध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. हे पाहता भाजपचे इथं पारडं जड आहे. त्या पाठोपाठ शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचा नंबर लागतो. पण असे असलं तरी या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. पाईप लाईन योजना, अतिक्रमण करुन बांधकाम, रिंग रोड, आदिवासी नागरिकांच्या समस्या, रेल्वे स्टेशन्स, मुंबई-गोवा महामार्ग अश्या अनेक समस्या भाजप सरकार सोडवू शकलेलं नाही. त्यातच डान्सबार सुरु झाल्याने इथला मतदार संतापलेला आहे. म्हणूनच शरद पवारांनी पार्थचा पत्ता खेळायचं ठरवलं आहे. परंतु काहीही असलं तरी हा मतदार यावेळी कोणाला कौल देईल हे निकालातूनच स्पष्ट होईल.

मावळ लोकसभा मतदार संघ

2009 च्या निवडणूकीत मिळालेली मतं

एकूण मतदार - 16 लाख 43 हजार 408
गजानन बाबर - शिवसेना - 3 लाख 64 हजार 857 (विजयी)
आझम पानसरे - राष्ट्रवादी काँग्रेस - 2 लाख 84 हजार 238

--------------------

2014 च्या निवडणूकीत मिळालेली मतं :

एकूण मतदार - 19 लाख 22 हजार 343

श्रीरंग बारणे (शिवसेना) - 5 लाख 12 हजार 226 (विजयी)
लक्ष्मण जगताप (शेकाप+मनसे) - 3 लाख 54 हजार 829
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 लाख 82 हजार 293