नाशिक : मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. मला प्रचंड वेदना होत आहेत, सारख्या सलाईन घेतोय. मी आता सलाईन तोडून आलोय. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्या समाजाचा लढा एवढ्यावेळी अर्धवट राहू देऊ नका. आरक्षणापासून समाज लांब राहू नये. त्यामुळे सर्वजण एका जागी ताकतीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांना घातली. लासलगावमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं. 


मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या शरीरात इतक्या वेदना होतात की माझे शरीर मला साथ देत नाही. फक्त मायबाप मराठ्यांची ताकद वाढावी, बळ वाढलं पाहिजे म्हणून धीर धरून लढतोय. मी कधी जाईन माहीत नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील, मला माहित नाही. कारण शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते असेही जरांगे शेवटी म्हणाले. 


Manoj Jarange Nashik Speech : काय म्हणाले मनोज जरांगे? 


माझ्यावर अनेक बंधन आहेत. मी आदर्श आचारसंहितेचे पालन करतोय. महाराष्ट्र सदन खाल्लं, त्यांना काही होत नाही. मी सगळ्यांच्या डोळ्यात खुपतोय. समाजाच्या न्यायासाठी लढतोय. आज येवलेकरांची एकजूट बघून संपूर्ण महाराष्ट्र रात्रभर झोपणार नाही. मला मागे बघायची सवय नाही, मी येवल्याचा थोडीच आहे . मी काय बघायचं ते थेट पुढूनच पाहतो. परिस्थितीने जरी मराठा घेरला तरी तुम्हाला एक दोन काम सांगतोय तेवढं करा. मराठा बलाढ्य असल्यामुळे कोणत्याही पक्षात तुम्ही काम करा. पण मतदानाच्या दिवशी जातवान आणि खानदानी मराठ्यांना आणि आरक्षणाच्या बाजूने मतदान करा. प्रत्येक पक्षात मराठा असणारा कोणाचाही कार्यकर्ता असला, त्याच्या अडचणीमुळे जरी तो इकडे तिकडे असला तरी मतदान केंद्रावर गेल्यावर डोळे झाकून फक्त आपली मुलं, आपली जात आणि आरक्षण आणा. 


मतदान करताना आपला शेतकरी डोळ्यासमोर आणा. आज जात संकटात सापडली आहे. या लासलगावमधून मी राज्यातल्या मराठ्यांना हात जोडून सांगतो. सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज आता मागे पडलाय.  राजकारणातला देखील मराठा मागे पडलाय. ज्या सरकारनं आपल्याला वेठीस धरलंय त्याला डोळ्यासमोर ठेवायचं आणि शंभर टक्के मतदान करायचं. आपल्यासोबत ओबीसी, धनगर, मुस्लिम सर्वच आहेत. पाडापाडी सुरू झाली तर मागच्यावेळी 29 गेले. जर मुसलमान आणि मराठे या उठावात शहाणे झाले नाही तर मुस्लिमांनी फक्त केळी विकायची आणि मराठ्यानी फक्त ऊसच विकायचे. पाव विकायला, केळी विकायला मुसलमान आणि केळी आणून द्यायला मराठा. 


जर तुम्हाला सुधारायचे असेल तर यावेळी कोणीच मागे पुढे पाहायचं नाही, हेवे दावे पाहायचे नाहीत. एक पण मराठा, मुस्लिम घरी नाही राहिला पाहिजे. 100% मतदान करायचं. मी कुणाला पाडा म्हटलो नाही, मी कुणाच नाव घेतलेलं नाही. मी घाणीचं नावच घेत नसतो. एखाद्या पवित्र शहराच्या नावाला का डाग लावायचा? ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मतदान तुमचं, मालक पण तुम्हीच. मी कधी फुटणार नाही, कधीच मॅनेज होणार नाही. 


आता पुन्हा सामूहिक आमरण उपोषण ठेवलंय. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवालीमध्ये येणार आहेत. आता गावागावात उपोषण करायचं नाही. कुणाचही सरकार येऊ दे, आता मी सरकारचं डोकंच बंद पाडतो. मी कुणाच्याही बापाला घाबरत नसतो. आता आपल्याला आरक्षणाचा तुकडाच पाडायचा आहे . अर्धे लोक शेतीसाठी घरी ठेवा. एकदाच आता आरक्षण घ्यायचंय, त्यामुळे सगळेच या. तुमची गर्दी पाहून तुम्ही निवडणुकीत देखील गेमच करणार असं दिसतंय. 


मला प्रचंड वेदना आहेत, सारख्या सलाईन आहेत. मी सलाईन तोडून आलोय, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती माझ्या समाजाचा लढा एवढ्यावेळी अर्धवट राहू नये आरक्षणापासून ते लांब राहू नये. सर्व जण एका जागी ताकतीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू. माझ्या शरीरात इतक्या वेदना होतात की माझे शरीर मला साथ देत नाही. फक्त मायबाप मराठ्यांची ताकद वाढावी, बळ वाढलं पाहिजे म्हणून धीर धरून लढतोय. 


मी सरकारकडून कधीही मॅनेज होत नाही. माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही. माझं अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज. राजकारणासाठी या समाजाची एकजूट फुटू देऊ नका. हे फक्त चार दिवसांचं राजकारण, यापुढे कोणता नेता आपल्याला विचारणार नाही. कोणता नेता किंवा कोणता पक्ष आपल्याला आधार द्यायला, कोणीही येणार नाही.  कोणीही आडवा आला तर सोडायचं नाही, आरक्षणापासून हटू नका. माझी जात कधीच तुटू देऊ नका. तुमचा खांद्यावर ही जबाबदारी आहे. मी कधी जाईन माहीत नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन, मला माहीत नाही. कारण शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते. तुम्हाला जे करायचं ते करा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आपली जात काहीही करून एकजूट ठेवा आणि आरक्षणाला विरोध करणारे जेवढे कुणी महाराष्ट्रात असतील ते पुन्हा कधीच उभे नाही राहिले पाहिजे.