सोलापूर : वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोनवेळा विजयी झाले होते. या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाची गणितं बदलून गेली आहेत. यामुळे यंदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी भाजप असे दोन्ही गट एकत्र आल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सव्वालाख मतांच्या फरकाने निवडून आला. अकलूजमधील मोहिते पाटील घरातील भाऊबंदकीदेखील आता भाजपच्या मागे एकत्रित उभी राहिल्याने मोहिते पाटील घराण्याचे दोन्हीही गट आता एकाच झेंड्याखाली आले आहेत. याशिवाय पूर्वीपासून भाजपकडे असलेले उत्तमराव जानकर, के. के. पाटील यांचाही गट आता मोहिते पाटील गटात सामील झाल्याने माळशिरस मतदारसंघात आता मोहिते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याची आमदारकी नक्की होणार आहे.

मागील दोन टर्म माळशिरस मतदारसंघातून आमदारकी जिंकणारे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्याजागी आता मोहिते पाटील कोणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपसाठी जिल्ह्यातील सर्वात जास्त सुरक्षित मतदारसंघ म्हणून माळशिरसाची ओळख तयार झाली आहे. यंदा माजी आमदार डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत असून याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील वादातीत नाव म्हणून ओळख असलेले डॉक्टर विवेक गुजर यांचेही नाव समोर येऊ लागले आहे. माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्याकडे सर्वच जातीचे दिग्गज नेते असल्याने या राखीव मतदारसंघासाठी भीमराव साठे आणि बाळासाहेब धाईंजे यांचीही नावे चर्चेत आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि राम सातपुते हे दोघे थेट मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या दोघांच्या चर्चेतून ज्याला उमेदवारी मिळेल तोच येथील आमदार असणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांनी माळशिरस मध्ये संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निवडणुकीत त्यांना येथून पडलेली मते पाहता विरोधकांना येथे उमेदवाराच्या शोधापासून सुरुवात करावी लागणार आहे. येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील याना राष्ट्रवादीच्या मदतीने एखाद्याच्या गळ्यात उमेदवारी घालावी लागणार असली तरी सध्या कोणाचेच नाव अजून समोर आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला आलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. याचठिकाणाहून वंचितदेखील उमेदवाराच्या शोधात असून भाजपाला टक्कर देऊ शकेल असे नाव अजून तरी समोर आलेले नाही. एकंदर यंदा माळशिरसमध्ये मोहिते पाटील ज्याला उमेदवारी देतील तो येथून जिंकणार हे मात्र नक्की.

2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते
हनुमंतराव डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस ) - 77179
अनंत जयकुमार खंडागळे (भाजप पुरस्कृत अपक्ष ) - 70934
सरवदे लक्ष्मण विठ्ठल (शिवसेना ) - 23502