नाशिक : मालेगाव महापालिकेत भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा गट स्थापन केला होता. या गटाची नोंदणी 30 जानेवारीला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर या गटाची नोंदणी करु नये असा अर्ज भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे. भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड आणि प्रविण पाटील या दोघांनी गट नोंदणी करु नये असा अर्ज 2 फेब्रुवारी म्हणजे आज दिला आहे.   

मालेगावात महापौर निवड प्रक्रियेआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  दोन दिवसांपूर्वी स्थापन करण्यात आलेला भाजप व काँग्रेस नगरसेवकांचा गट रद्द करण्यासाठी आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या मालेगावातील दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेससोबतचा गट रद्द करण्याची मागणी केली आहे. 

काँग्रेससोबत भाजपच्या दोघा नगरसेवकांनी ‘ भारत विकास आघाडी ’ नावाने गट स्थापन केला होता. विभागीय आयुक्त कार्यालयातील गट नोंदणी रद्द करावी असा अर्ज देण्यात आला आहे. भाजपच्या मदन गायकवाड आणि प्रविण पाटील यांनी एक अर्ज दिला आहे. 

देशभरात आणि राज्य पातळीवर एकमेकांविरोधात लढणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा गट स्थापन केल्यानं राज्यभर चर्चा झाली होती. काँग्रेस व भाजप एकत्र आल्याने राज्यभरात या गटाची चर्चा झाली मात्र अवघ्या दोन दिवसातच या गटाच्या स्थापनेला ब्रेक लावण्यात आला.  कट्टर विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. भाजपच्या या निर्णयाने मालेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

 मालेगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळेल अशा जागा मिळालेल्या नाहीत. मालेगावात इस्लाम पक्षाल सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे दोन्ही पक्षाचे मिळून 40 नगरसेवक आहेत. 

मालेगावात महापौरपदासाठी 7 फेब्रुवारीला निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. मालेगाव महापालिकेत बहुमताचा आकडा 43 आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा महापौर मालेगावात बसू शकतो.   

मालेगावातील पक्षीय बलाबल 

इस्लाम पार्टी : 35एमआयएम : 21शिवसेना : 18समाजवादी पार्टी :5काँग्रेस : 3भाजप : 2